Breaking News
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन वरळीचा हुबेहुब त्रिमितीय नकाशा तयार
नागरी प्रशासनासह विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करताना होणार मोलाची मदत
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
लोकसंख्या वाढ आणि भौगोलिक विस्तार यामुळे मुंबई महानगराच्या प्रशासनावर येणारा ताण नवीन नाही. त्यातून दैनंदिन आणि नवनवीन आव्हाने झेलून कामकाज करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सातत्याने मदत घेणा-या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने क्रांतिकारी असे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जी/दक्षिण विभाग अंतर्गत वरळी परिसराचा सुमारे १० चौरस किलोमीटर क्षेत्राचा त्रिमितीय नकाशा तयार करुन डिजीटल स्वरुपातील ‘प्रतिवरळी’ साकारण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेला हा प्रकल्प मुंबई महानगराच्या नागरी प्रशासनासाठी मोलाचा ठरणार आहे. यानिमित्ताने, थ्री डी मॅपिंग असणा-या आंतरराष्ट्रीय शहरांच्या यादीमध्येही मुंबईचा प्रवेश झाला आहे.
वाढती लोकसंख्या व विस्तारणारा भौगोलिक परिसर पाहता मुलभूत नागरी सेवा-सुविधा पुरवणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, मोठे प्रकल्प राबविणे हे प्रशासकीय दृष्ट्या आणि इतरही कारणांनी मोठे आव्हान ठरते. त्यातच दैनंदिन कामकाज सांभाळून या सगळ्या गरजांची पूर्तता करताना नागरी प्रशासनाची दमछाक होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिलासा तर मिळतोच, समवेत नागरी प्रशासन, प्रकल्प अंमलबजावणी इत्यादी वेगाने होवू शकते. हे ओळखून राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगर क्षेत्राचा डिजीटल स्वरुपात त्रिमितीय नकाशा तयार करण्यासाठी म्हणजेच थ्री डी मॅपिंग करण्यासाठी सूचना केल्या आहेत. त्याची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात म्हणून जी/दक्षिण विभागातील वरळी परिसराचा सुमारे १० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा त्रिमितीय नकाशा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त तथा संचालक (माहिती व तंत्रज्ञान) शरद उघडे यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. सदर डिजीटल थ्री डी तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड यांची मदत लाभली आहे.
याअनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या की, आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून प्रशासनाला वेग देतानाच नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी देखील मदत होत असते. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जीआयएस, एसएपी, रोबोट, ड्रोन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यापूर्वीच अवलंब केला आहे. त्यात थ्री डी मॅपिंगची भर पडली आहे. महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागाने सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यानुरुप साधनांचा स्वीकार केला आहे. आता थ्री डी मॅपिंग करणारा मुंबईतील पहिला प्रशासकीय विभाग म्हणून देखील जी/दक्षिण विभागाची आता नोंद झाली आहे.
या प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती देताना महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त तथा संचालक (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे म्हणाले की, आधुनिक काळात फक्त कागदावरचे नकाशे पाहून प्रशासन करणे तुलनेने आत्यंतिक कठीण आहे. डिजीटल तंत्रज्ञान आणि त्याच्या आधुनिक साधनांचा उपयोग करुन बनविलेले नकाशे हे प्रशासन करताना कामकाजाचा दृष्टिकोनच आमूलाग्रपणे बदलून टाकतात. थ्री डी मॅपिंग अर्थात त्रिमितीय नकाशा पद्धतीने कोणत्याही परिसराचे आभासी परंतु हुबेहूब रुप पाहता येते. संपूर्ण ३६० अंशातील अवलोकन करुन, उंची-रुंदी, खोली, जाडी अशा सर्व पैलुंनी तो परिसर पाहता येतो. त्यामध्ये कोणताही बदल झाला तर लागलीच प्रत्यक्षात पडताळता येते व पुरावा म्हणून त्याचा उपयोगही करता येतो. भूस्थानिक नकाशा अर्थात जिओस्पेशियल मॉडेल हे नागरी प्रशासनासाठी महत्त्वाचे आहेत. फक्त प्रकल्पांची अंमलबजावणीच नव्हे तर पायाभूत सेवा-सुविधांचे योग्य नियोजन करुन त्यांचा दर्जा उंचावणे, नागरी सेवा-सुविधांचे मूल्यमापन करणे, आपत्ती व्यवस्थापन प्रभावीरित्या करणे, वातावरण बदलांच्या प्रभावाचे विश्लेषण करणे, जनतेची सुरक्षितता अशा एक ना अनेक कामकाजामध्ये या त्रिमितीय नकाशा तंत्रज्ञानाची बहुमोल मदत होते, असे उघडे यांनी नमूद केले.
प्रायोगिक तत्त्वावर राबवून यशस्वी झालेल्या या प्रकल्पाच्या आधारे आता भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांना, मुंबई महानगर प्रदेशातील राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांना महानगराचे नियोजन आणि व्यवस्थापनात मोठी मदत होणार आहे. तयार करण्यात आलेले थ्री डी मॅपिंग हे महानगरपालिकेच्या क्लाउडवर असणार आहे. ज्यामध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांची संपूर्ण भौगोलिक माहिती, सांख्यिकी, संगणकीय प्रणाली देखील उपलब्ध आहे. त्यामुळे कामकाजामध्ये एकमेकांशी समन्वय वाढवून नियोजन करणे, प्रभावी अंमलबजावणी करणे, आर्थिक तसेच वेळेची बचत करणे शक्य होणार आहे. यातून प्रशासन आत्यंतिक प्रभावीपणे करता येईल.
रिपोर्टर