Breaking News
गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक
- मुंबई महापालिकेच्या उप आयुक्तांच्या मार्गदर्शनात श्री गणेशोत्सव समन्वय बैठक संपन्न
मुंबई : प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव निमित्ताने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात आज एक समन्वय बैठक संपन्न झाली. प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. तथापि, अशा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून तयार करण्यात आलेल्या घरगुती श्री गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असणार आहे, असे मुंबई महानगरपालेकेने स्पष्ट केले.
“महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव पुढील महिन्याच्या अखेरीस येत असून, या निमित्ताने श्री गणरायाचे स्वागत करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर विविध स्तरिय कामे योग्यप्रकारे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करणे, झाडांची सुयोग्यप्रकारे छाटणी करणे आणि रस्त्यांच्या परिरक्षणाची कामे करणे; यासारखी विविध स्तरिय कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे चांगल्याप्रकारे करण्यात येत आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर साधण्यात येणारा सुसमन्वय हा निश्चितच कौतुकास्पद आहे”, असे गौरवोद्गार मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती तथा मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव श्री. विनोद घोसाळकर यांनी काढले. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयात आयोजित समन्वय बैठकीला संबोधित करताना बोलत होते.
..
या बैठकीला ‘परिमंडळ – २ चे उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक’ हर्षद काळे, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी व ‘पी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह मुंबई पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, मुंबई उपनगरे गणेशोत्सव समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी – प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांचे आणि संबंधित खात्यांचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.
..
या बैठकी दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना परिमंडळ – २ चे उप आयुक्त हर्षद काळे यांनी सांगितले की, पुढील वर्षाच्या श्री गणेशोत्सवापासून म्हणजेच सन २०२३ च्या श्री गणेशोत्सवापासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेश मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध असणार असून, शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या श्री गणेश मूर्तींचीच खरेदी – विक्री करणे बंधनकारक असणार आहे.
..
तर कोविड कालावधीनंतर होणा-या यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. तथापि, अशा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून तयार करण्यात आलेल्या घरगुती श्री गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या मूर्तींवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे ठळकपणे नमूद करणेही बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरुन विसर्जन व्यवस्थेत असणा-यांना ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची श्री गणेश मूर्ती ओळखणे सुलभ होईल, अशीही माहिती काळे यांनी बैठकी दरम्यान दिली.
..
त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान घरगुती श्री गणेश मूर्तींची उंची ही २ फुटांपेक्षा अधिक नसावी, तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांसाठीच्या श्री गणेश मूर्तींची उंची ही शक्य तेवढी कमी असावी, असेही आवाहन काळे यांनी आजच्या बैठकी दरम्यान केले. त्याचबरोबर मंडप परवानग्या व महानगरपालिकेच्या स्तरावर दिल्या जाणा-या अन्य परवानग्या या गेल्यावर्षी प्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी योजना राबविण्यात येत असून त्या द्वारे परवानग्या देण्यात येत आहे. या अनुषंगाने देखील उप आयुक्त श्री. काळे यांनी आजच्या बैठकी दरम्यान माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. तसेच अनुज्ञापन खात्याद्वारे आणि मुंबई अग्निशमन दलाद्वारे देण्यात येणा-या परवानगी प्रक्रियेचाही त्यांनी आढावा घेतला.
रिपोर्टर