Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
"वॉक विथ कमिशनर" दरम्यान मिरा भाईंदर महानगर पालिका मा. आयुक्त यांनी मिरागाव येथील मनपा शाळेत विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसून शिक्षकांच्या अध्ययनाचे पर्यवेक्षण केले.
"वॉक विथ कमिशनर" संकल्पनेतून मा. आयुक्त यांनी दहिसर चेकनाका ते मिरा गाव याठिकाणी केला पाहणी दौरा
मिरा भाईंदर : संदिप शिंदे..
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील साफसफाई बाबत, उद्यानाबाबत प्राप्त तक्रारी, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावर अनधिकृतरित्या बसणारे फेरीवाले या नागरिकांच्या सततच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात ठेवून आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी "वॉक विथ कमिशनर" या संकल्पनेतून सकाळी 8.00 वाजल्यापासून दहिसर चेकनाका पासून मिरा गाव या परिसराचा पाहणी दौरा केला.
सदर पाहणी दरम्यान मा. आयुक्त यांनी दहिसर चेकनाका ते डेल्टा गार्डन, मिरा गाव याठिकाणी फुटपाथवरील टपऱ्या, अनधिकृत शेड, फेरीवाले, अनधिकृतरीत्या विजेच्या पोलवर लावण्यात आलेले बॅनर, रस्त्याच्या कडेला तसेच फूटपाथ व दुकानासमोर ठेवण्यात येणाऱ्या कुंड्या यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले. निर्देशानुसार फुटपाथवर असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर, शेड व विजेच्या पोलवरील बॅनरवर अतिक्रमण विभागामार्फत तातडीने कारवाई करण्यात आली. फूटपाथ व रस्त्यांवर काही ठिकाणी गटारांची तुटलेली झाकणे ही नव्याने बसविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना देण्यात आले. तसेच रस्त्यापासून ते फूटपाथपर्यंत डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी साफसफाई ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाहणी दरम्यान सार्व. आरोग्य विभागाकडून रस्त्यावरील धूळ साफ करण्याकरिता चांगल्या व मजबूत गुणवत्तेचा ब्रश झाडू वापरण्यात यावा असे निर्देश दिले.
दहिसर चेकनाका ते मिरा गाव या परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ढीग उचलून नियमित ते स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या, खाद्यविक्रेते यांच्याकडून अस्वच्छता पसरत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मा. आयुक्त यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास दिले. डेल्टा गार्डन येथील सतकरी तुळशी तलाव उद्यान येथे पाहणी करताना उद्यानात विविध प्रकारची फुलझाडे लावून त्यांची अतिरिक्त वाढ झाल्यास छाटणी करण्याचे आदेश उद्यान विभागास दिले.
मा. आयुक्त यांनी मिरा गाव येथील मराठी शाळा क्रमांक 20 व उर्दू शाळा क्रमांक 32 याठिकाणी भेट दिली. भेट देताना शाळेतील परिसरात नियमित स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शाळेभोवती लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखून आणखी नवीन प्रकारची फुलझाडे परिसरात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. डिजिटल वर्गास भेट दिली असताना वर्गातील शिक्षक हे कशाप्रकारे डिजिटल बोर्डचा वापर करत आहे याची मा. आयुक्त यांनी वर्गात विद्यार्थ्यांबरोबर बसून शिक्षकांच्या अध्ययनाचे पर्यवेक्षण केले. तसेच शिक्षकांशी संवाद साधून दैनंदिन अध्ययनात येणाऱ्या शालेय समस्येबाबत चर्चा केली. वर्गातील बेंच हे नव्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश बांधकाम विभागास दिले. त्याचबरोबर शाळेत रंगरंगोटी करून त्यावर शाळेच्या निगडित विषयांवर वॉल पेंटिंग करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी बांधकाम व शिक्षण विभागास दिले. सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबीत, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रिपोर्टर