Breaking News
मुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम
कोविडच्या तिस-या लाटेची संभाव्यता लक्षात घेता मुंबई महापालिका सतर्क झाली असून प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे यासंदर्भात नुकतीच एक आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये महापालिकेच्या अधिका-यांसह इतर संबंधित विभागातीलही अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसात कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वीचे याबाबतचे अनुभव लक्षात घेता, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आपण अत्यंत सजग आणि सतर्क राहून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने या आधीपासूनच लागू असलेल्या नियमानुसार ज्या इमारतींमध्ये पाच किंवा पाचपेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून आल्यास अशी इमारत ‘सील’ करण्यात येते. या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आणि अधिक कठोरपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या बैठकी दरम्यान दिले.
यासह तिस-या लाटेची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे व ठामपणे करण्यात येत आहेत. यामुळे संबंधीत इमारतींमधील नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते, याची नम्र जाणीव महानगरपालिका प्रशासनाला आहे. तथापि, कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने हे गरजेचे असून, यासाठी सर्व संबंधितांनी परिपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन देखील या अनुषंगाने मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आले.
यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या इमारती सील करण्यात येतील, अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. तसेच इमारतींमध्ये असणा-या कोणत्याही व्यक्तिला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही.
इमारत सील करण्याविषयीची प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देखील महानगरपालिका आयुक्तांनी या बैठकी दरम्यान दिले. त्याचबरोबर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने देखील निर्धारित करण्यात आलेल्या कार्य पद्धतीनुसारच सील इमारती विषयक आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळच्यावेळी करण्याचे निर्देशही दिले.
तसेच कोविडच्या तिस-या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्रकारच्या कोविड विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश. या अंतर्गत प्रामुख्याने सर्व रुग्णालयांमधील आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा, जसे की, रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधे-गोळ्या-इंजेक्शन्स साठा इत्यादी सर्व बाबींचा आढावा घेऊन संभाव्य गरजेनुसार अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्यासह संबंधीत सह आयुक्त, उप आयुक्त, मुंबई पोलीस दलातील उप आयुक्त (अभियान / Operations) हे मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर महापालिकेचे संबंधीत सहाय्यक आयुक्त, संबंधीत खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता व संबंधीत तज्ज्ञ डॉक्टर देखील या बैठकीला उपस्थित होते.
रिपोर्टर