Breaking News
मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कामगिरीची देश पातळीवर दखल घेण्यात आली आहे. दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर परिणामकारक दंतोपचार करणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सोयी-सुविधा विषयक कामगिरीची दखल नुकतीच २ राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे.
‘आऊटलुक’ साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्ये तिसरे स्थान देत आपल्या महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. तर ‘द वीक’ या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर दंत महाविद्यालयाला पाचवे स्थान दिले आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी नायर दंत महाविद्यालयाच्या सर्व चमुचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील दोन वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याने नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीसह तेथील सुविधांचा देखील राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असल्याचे नमूद करीत नायर दंत महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी या बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मार्च २०२० पासून उद्भवलेल्या कोविड काळात नायर दंत महाविद्यालय आणि दंत रूग्णालय अव्याहतपणे कार्यरत आहे. कोविड सारख्या साथरोगाच्या परिस्थितीत दंत वैद्यकीय सेवा देताना साथरोगाचा संसर्ग होऊ नये, या दृष्टीने आत्यंतिक काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, हे आव्हान नायर दंत महाविद्यालयातील विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक व शिक्षक मंडळी समर्थपणे हाताळत आहेत. अधिकाधिक नाविण्यपूर्ण आणि गुणवत्तेला प्राधान्य देणा-या सेवांचा नियमितपणे विस्तार करणा-या नायर दंत महाविद्यालयात एकावेळी ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी दंत वैद्यकीय बाबींचे शिक्षण घेत असतात. यामध्ये पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि तीन वर्षीय पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी ५७ प्राध्यापक (शिक्षक) या महाविद्यालयात कार्यरत आहेत.
रिपोर्टर