Breaking News
भविष्यात वातावरणाशी अनुकूलता राखून नियोजन करणे सोपे होणार
मुंबई :
वातावरण बदलाच्या परिणामांचे सर्वाधिक धोके असलेल्या शहरांपैकी मुंबई महानगर एक आहे. त्यामुळे मुंबईला वातावरण सक्षम बनविण्यासाठी मुंबईच्या पहिल्या वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. आराखड्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती, नागरिक यांना सूचना, शिफारशी, हरकती पाठविता याव्यात, यासाठी संकेतस्थळाचे लोकार्पण यानिमित्ताने करण्यात आले. हा आराखडा मुंबई महानगराला भविष्यात वातावरणाशी अनुकूलता राखून अधिक चांगले नियोजन करणे, धोके कमी करणे आणि सक्षमता राखणे यांची खात्री राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
डिसेंबर २०२० मध्ये मुंबई सी ४० शहरांच्या जाळ्यामध्ये (सी ४० सिटी नेटवर्क) सहभागी झाले आहे. मुंबई महानगराचा वातावरण कृती आराखडा (Mumbai Climate Action Plan) २०२१ च्या अखेरीस तयार होईल. सी ४० ची मार्गदर्शक तत्त्वे आणि महत्वाकांक्षी निकषांना अनुसरुन हा आराखडा तयार होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा विकसित होत आहे. डब्ल्यूआरआय हे यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई वातावरण कृती आराखडा हा सहा प्रकारच्या कृती मार्गांवर, उपायांवर लक्ष्य केंद्रीत करतो. घनकचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, महानगरातील हिरवळ आणि जैवविविधता, पूर आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन, उर्जा कार्यक्षमतेची उभारणी, स्वच्छ हवा आणि शाश्वत वाहतूक यंत्रणा हे सहा संकल्पनाधारीत कृती मार्ग आहेत. यामुळे विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने धोके कमी करणारे अनुकूल असे विशिष्ट धोरण तयार होवून अंमलबजावणी करण्याजोगे वातावरण प्रकल्प मुंबई महानगराला सक्षम करण्यासाठी मदत करतील. त्यादृष्टीने या आराखड्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.
तज्ज्ञ आणि नागरिकांकडून सूचना स्वीकारण्यासाठी मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या (एमकॅप) संकेतस्थळाचे उद्घाटन यावेळी ठाकरे यांनी केले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून मुंबई वातावरण कृती आराखड्या बाबत तज्ज्ञ व्यक्ती तसेच नागरिक त्यांच्या सूचना, शिफारशी दिनांक २० सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवू शकतील. मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या अंतर्गत असलेले संकल्पनाधारीत सहा कृती मार्ग, उपाय हे नोव्हेंबर २०२१ पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषदेच्या (युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉनफरन्स - COP26) नजीकच्या काळात तयार होण्याची शक्यता आहे.
शुभारंभ कार्यक्रमास राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे महानगर आयुक्त एस. व्ही.आर.श्रीनिवास, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सचिव अशोक शिनगारे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे, उपआयुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर, सी ४० सिटीजच्या दक्षिण आणि पश्चिम अशिया विभागाच्या विभागीय संचालक श्रुती नारायण, डब्ल्यूआरआयचे कार्यकारी संचालक माधव पै, डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर ऑफ सस्टेनेबल सिटीजच्या सहयोगी संचालक श्रीमती लुबैना रंगवाला, पर्यावरण मंत्री यांचे संशोधन व धोरण सचिव (खासगी) सौरभ पुनमिया हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
रिपोर्टर