Breaking News
कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत मुंबईतील पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर
- १८८ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’चे १२८ रुग्ण
कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे कठोर पालन करण्याचे पालिकेचे आवाहन
मुंबई :
कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित झाल्यानंतर करण्यात आलेल्या पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. पहिल्या तुकडीतील एकूण १८८ नमुन्यांमध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे २, केपा प्रकाराचे २४ तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.
डेल्टा प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे, अशी काळजी सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब) स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर सदर यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित होवून कार्यान्वित करण्यात आली आहे. या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जनुकीय सूत्र निर्धारण करू शकणारे दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस.जी.- बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कस्तुरबा रूग्णालयातील जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.
या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्याच चाचणी तुकडीचा (फर्स्ट बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण १९२ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२८ रूग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे २, केपा प्रकाराचे २४ तर इतर रूग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करून उपचारांना वेग देणे शक्य झाले असल्याचे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रिपोर्टर