Breaking News
बोरिवलीच्या चिकूवाडीत महापालिकेने ओसाड जागी फुलवले नयनरम्य उद्यान
- पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानामुळे परिसराचे रूपडे पालटले
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
बोरिवली पश्चिम चिकूवाडी येथील ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने करून दाखवल्याने या परिसराचे रूपच पालटले आहे. कधीकाळी निर्मनुष्य भासणारा हा परिसर आता उद्यानांमध्ये येणा-या आबालवृद्धांमुळे फुलून जातो. विशेष म्हणजे, या दोन्ही उद्यानांमध्ये असणाऱ्या शोषखड्डयांमुळे रिंगवेलद्वारे उपलब्ध होणारे पाणी उद्यानातील सिंचनासाठीच पुनर्वापरात येते. परिणामी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लीटर पाण्याची बचत करण्याची किमया देखील या उद्यानांनी साध्य केली आहे.
बोरिवली पश्चिम मधील चिकूवाडी येथे वसंत संकूल मागील परिसरात, मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेला सुमारे ५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड सन २०१३ मध्ये महानगरपालिकेच्या ताब्यात आला. त्यावेळी ही जागा ओसाड स्वरूपाची आणि काहीशी दुर्लक्षितच होती. या भूखंडांच्या बाजूने एक मोठा नाला देखील वाहतो. स्वाभाविकच सदर परिसराच्या भौगोलिक विकासाला चालना मिळत नव्हती. त्यामुळेच हा परिसर काहीसा निर्मनुष्य होता. यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने मनोरंजन मैदानासाठी आरक्षित या जागेवर उद्यान विभागाच्या माध्यमातून संकल्पीय उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
या जागेच्या मधोमध रस्ता जात असल्याने एका बाजूस पाम उद्यान तर दुसऱ्या बाजूस सुगंधी उद्यान ही संकल्पना निश्चित करुन उद्यानाची निर्मिती सुरु करण्यात आली. मुंबई महागरपालिकेच्या उद्यान विभागाने टप्प्या-टप्प्याने रोप लागवड करीत ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत दोन्ही उद्याने तर फुलवली, यामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट घडून आला. या उद्यानांमध्ये कोणतेही मोठे स्थापत्य बांधकाम करण्यात आले नसल्याने, अत्यंत वाजवी खर्चात उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे ७ हजार ७९५ चौरस मीटर जागेवर फुललेल्या पाम उद्यानाचे 'गोपीनाथजी मुंडे मनोरंजन मैदान’ तसेच ६ हजार ८६२ चौरस मीटर जागेवरील सुगंधी उद्यानाचे ‘प्रमोदजी महाजन मनोरंजन मैदान’ असे नामकरण करण्यात आले आहे. या मैदानांवर फेरफटका मारणे म्हणजे निवांतपणाची सुखद अनुभूती ठरते आहे. नेत्रसुखद हिरवळ आणि आसमंतात दरवळणारा सुगंध यामुळे नागरिकांची पावले आपसूकच या उद्यानांकडे वळतात. परिसरातील इमारतींमधूनही या उद्यानांचे सुंदर विहंगम रुप दिसते. बोरिवलीतील आकर्षक स्थळ म्हणून ही उद्याने आज मिरवत आहेत.