Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
सायबर गुन्ह्यांवर "गरुड दृष्टी", नागपूर पोलिसांची प्रभावी मोहीम..
सायबर गुन्हे अधिकाधिक प्रगत होत असले तरी प्रत्येक गुन्ह्याचा डिजिटल पुरावा मागे राहतो आणि त्याचा शोध घेऊन गुन्हेगारांना गाठण्याची क्षमता महाराष्ट्र पोलिसांकडे असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
नागपूर : प्रतिनिधी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे "गरुड दृष्टी" सोशल मीडिया मॉनिटरिंग प्रकल्पाचे सादरीकरण संपन्न झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सोशल मीडिया हे जसे अभिव्यक्तीचे माध्यम आहे, तसेच द्वेष पसरवणे, अमली पदार्थांची अवैध देवाण-घेवाण आणि गुन्हेगारीसाठीही वापरले जाते. "गरुड दृष्टी" हे नागपूर पोलिसांनी विकसित केलेले अत्याधुनिक "टूल" असून, याच्या माध्यमातून भारतविरोधी, जातीय तणाव निर्माण करणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या किंवा अमली पदार्थांच्या विक्रीसंबंधित पोस्ट्सचा मागोवा घेऊन त्यावर तातडीने कारवाई करता येईल. हे टूल भविष्यात राज्यातील इतर युनिट्समध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमात सायबर फसवणुकीतून पोलिसांनी वाचवलेली रक्कम पीडितांना परत देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वेळेत दिलेल्या तक्रारींमुळे आणि पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे नागरिकांचे लाखो रुपये वाचवणे शक्य झाले. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा ऑनलाईन ऑफरबाबत सतर्क राहावे आणि फसवणुकीच्या घटनांबाबत त्वरीत 1930 किंवा 1945 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
सायबर गुन्हे अधिकाधिक प्रगत होत असले तरी प्रत्येक गुन्ह्याचा डिजिटल पुरावा मागे राहतो आणि त्याचा शोध घेऊन गुन्हेगारांना गाठण्याची क्षमता महाराष्ट्र पोलिसांकडे असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
कार्यक्रमात पोलिस दलाच्या कार्याचे कौतुक करत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित नागरिकांनाही अभिनंदन केले आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध जनजागृतीसाठी त्यांना पोलिसांचे "राजदूत" म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले.
"गरुड दृष्टी" सोशल मीडिया मॉनिटरिंग प्रकल्पाची वैशिष्ट्ये व यश :
✅ सोशल मीडिया मॉनिटरिंग: गरुड दृष्टी सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोशल मीडियावरील 30,000 पोस्ट्स तपासण्यात आल्या आहेत.
✅ आक्षेपार्ह सामग्रीवर कारवाई: यापैकी 650 आक्षेपार्ह पोस्ट्सची नोंद घेऊन त्या संबंधित प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आल्या आहेत.
✅ कायदा व सुव्यवस्था नियंत्रण: सोशल मीडियामधून उद्भवणाऱ्या अफवा, द्वेषपूर्ण मजकूर, वादग्रस्त पोस्ट्स यामुळे होणारे तणाव व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी या साधनाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
✅ कमी खर्चातील स्थानिक नवकल्पना: सायबर हॅक 2025 स्पर्धेतून उदयास आलेले हे साधन अत्यल्प खर्चात विकसित करण्यात आले असून, याचे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) नागपूर पोलिसांकडे आहेत.
✅ बहुपयोगी क्षमता: गरुड दृष्टी केवळ गुन्हे प्रतिबंधासाठीच नव्हे, तर समाज माध्यमांवरील ट्रेंड्सचे विश्लेषण, संशयास्पद खाते शोधणे आणि तत्काळ कारवाई करण्यासाठी उपयुक्त आहे.
यावेळी संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर