Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
थोडक्यात महत्त्वाची बातमी..
पूर्व उपनगरात सुरु असलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी काल ( दिनांक 13 मे 2025 ) रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
मुंबई : प्रतिनिधी.
पूर्व उपनगरात सुरु असलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी काल ( दिनांक 13 मे 2025 ) रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यात मुलुंड पूर्व येथील होली एन्जल्स हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील रस्ते, पवई येथील सीमाशुल्क वसाहत परिसरातील रस्ते, हिरानंदानी जुना बाजार परिसरातील रस्ते, साकी विहार रस्ता आणि चेंबूर सहकारनगर येथील शेल कॉलनी मार्ग आदींचा समावेश आहे.
रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत दिनांक 20 मे 2025 पर्यंतच पेव्हमेंट क्वालिटी कॉंक्रिट (PQC) केले जाणार आहे. उर्वरित मर्यादित कालावधीत कामाचे दिवसनिहाय नियोजन करावे व ही कामे दिवसनिहाय पूर्ण करण्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
रस्तेबांधणीची अखेरची कामे ( Finishing Work ) जसे की, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी अत्युच्च दर्जाची असावी. कोणत्याही परिस्थितीत दुय्यम दर्जाच्या कामाशी तडजोड करू नये. आवश्यकता भासल्यास कामे पुन्हा करून घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
कॉंक्रिट रस्त्यांची कामे आटोपती घेत असताना पावसाळा दरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, यास महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे श्री. बांगर यांनी निक्षून सांगितले.
कॉंक्रिट रस्त्यांसमवेतच केले जाणारे पदपथ ( Footpath ) सर्वसामान्य पादचाऱ्यांसोबतच दिव्यांग व्यक्तींसाठीही सुगम्य ( Accessible ) आणि दिव्यांगस्नेही (disabled-friendly) असावेत.पदपथाचा पृष्ठभाग समान आणि अडथळारहित असावा. दृष्टिहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारी उभ्या/आडव्या रेषांची फरशी ( Tactile Path ) आवश्यक आहे, असेदेखील श्री. बांगर यांनी नमूद केले.
दिनांक 20 मे 2025 पर्यंत पीक्यूसी केल्यानंतर उर्वरित भागावर आवश्यकतेनुसार मास्टिक अस्फाल्ट वापरून रस्ते पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी आतापासून नियोजन करून कामे हाती घ्यावीत. मास्टिक व मास्टिक कुकरची उपलब्धता, पुरवठादार व कंत्राटदारामधील सामंजस्य करार ( MoU ), कुशल कामगार यांची सुनिश्चितता करावी, असे निर्देशदेखील श्री. बांगर यांनी दिले.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन देबबर्मा, महानगरपालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता श्री. गिरीश निकम यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
रिपोर्टर