Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सभागृहात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत आगामी पावसाळ्यात "झिरो कॅज्युलिटी मिशन" राबवण्याचा निश्चय करण्यात आला आहे.
पावसाळ्यात स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कुटूंबाना तात्पुरता निवारा देण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभारावीत, शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवावी तसेच अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे : एकनाथ शिंदे.
मुंबई : प्रतिनिधी.
मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना शहरातील नालेसफाई पूर्ण करावी, नाल्याचे मुख रुंद करून स्वच्छ करावेत, रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई पूर्ण करावी, अंतर्गत रस्ते स्वच्छ करावेत, नाल्यामध्ये अडकणारे प्लॅस्टिक तात्काळ वेगळे करावे तसेच शहरातील मॅनहोल उघडी राहणार नाहीत याची खात्री करावी. तसेच ती चोरता येणार नाहीत यासाठी त्यांना जाळी बसवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरडप्रवण क्षेत्रात जाळ्या बसवून ते भाग सुरक्षित करावेत, असे निर्देश यासमयी शिंदे यांनी दिले.
विशेष म्हणजे पावसाळ्यात स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कुटूंबाना तात्पुरता निवारा देण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभारावीत, शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवावी तसेच अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे.
पालिका, म्हाडा, एमएमआरडीए, रेल्वे,आर्मी, नेव्ही, एसडीआरएफ, एनडीआरएफची पथके सज्ज ठेवावीत जेणेकरून कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत लवकरात लवकर मदत पोहचवता येईल असे सांगून सगळ्या यंत्रणांनी मिळून एक टीम म्हणून काम करावे, अशी अपेक्षा याप्रसंगी शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी तसेच मुंबई महानगरपालिका, मध्य आणि पश्चिम रेल्वे, एनडीआरएफ, एसडीआरएफचे सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रिपोर्टर