Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद कायदेशीर मार्गदर्शन आणि चर्चासत्र संपन्न
चिपळूण : गुरुदत्त वाकदेकर.
यशवंतराव चव्हाण सेंटर केंद्र रत्नागिरी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमात हायकोर्टाचे ज्येष्ठ एडवोकेट प्रमोद ढोकळे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले कायदे त्यांचं संगोपन, त्यांचे हक्क याविषयी आपल्या कुटुंबातील मुला मुलींसोबत राहताना येणाऱ्या अडचणी याबद्दल सविस्तर चर्चासत्र देखील झाले. प्रश्नोत्तराच्या तासात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपले अनुभव यावेळी उपस्थितांसमोर मांडले.
भारतामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्यांमधील तरतुदी, मुलं सांभाळ करत नाहीत तर त्या संदर्भात कुठे आणि कशी तक्रार करावी याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
"आनंदाची गुरूकिल्ली" या विषयावर डॉक्टर सरदार यांनी उत्तम व्याख्यान केले. जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत गप्पा मारून आनंदाने जीवन जगण्याचे सोपे सूत्र सांगितले. या व्याख्यानात उपस्थित नागरिकांनीही चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी वय वर्ष 82 असलेल्या डॉक्टर साठे यांचा स्विमिंगमध्ये यशस्वी सहभाग नोंदवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला हायकोर्टाचे एडवोकेट प्रमोद ढोकळे, माधवबागचे सीआरझेड प्रमुख डॉक्टर मिलिंद सरदार, सुमती जांभेकर, फेस्कॉमचे सदस्य उस्मान बांगी, माजी तहसीलदार मारुती अंब्रे, ज्येष्ठ नागरिक दिव्यांग विभागाच्या प्रमुख दिपिका शेरखाने, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्रचे सचिव अभिजीत खानविलकर, सह्याद्री शिक्षण संस्थेचे श्री महाडिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा खिल्लारे यांनी केले.
रिपोर्टर