Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
पु. ल. कला महोत्सवात रसिक दंगले.
पु. लंच्या बंगाल साहित्य आणि सांगीतीक कारकिर्दीचा सुरेल संगम
मुंबई : गुरुदत्त वाकदेकर
सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित पु. ल. कला महोत्सव 2023 च्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी "शोंगित शिल्पी पी. एल. बाबू (पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्य संगीतमय भावबंध)" हा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमात रविंद्र संगीतासाठी अरुंधती देशमुख, बाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर यांनी उत्तम रचनांचं सादरीकरण केलं. तर ज्येष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. धनत्रयोदशीच्या दिवशी या कार्यकमाचं निरुपण करताना आपलं शब्दधन मुक्तकंठाने धनश्री लेले यांनी उधळलं. पु. ल. देशपांडे यांचे बंगाली भाषेशी असलेले नाते, त्यातून त्यांना भावलेले साहित्य, गाणी आणि त्यासंदर्भात असलेले अनेक रंजक, मजेदार आणि अनोखे किस्से ह्या कार्यक्रमातून उलगडण्यात आले. पु. लंच्या व्यक्तीमत्वातील बंगाली साहित्याचा हा अनोखा पदर रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून पत्रसूचना विभागाच्या महासंचालिका मोनिदिपा मुखर्जी उपस्थित होत्या. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका मीनल जोगळेकर यांच्या हस्ते मोनिदीपा मुखर्जी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अनेक भाग व्हायला हवे, इतकी सुंदर कलाकृती आपण सादर केलीत या शब्दात मोनिदिपा मुखर्जी यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले.
त्यानंतर "पु. ल. एक आनंदस्वर" हा पु. ल. देशपांडे यांच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित सुरेल संध्याकाळ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम ज्येष्ठ गायिका विदुषी आशा खाडीलकर आणि वेदश्री ओक, डॉ. राम पंडित, स्नेहल जोगळेकर, साधना काकटकर त्यांच्या सहकलाकारांनी सादर केला. कार्यक्रमाचं समयसूचक निवेदन दिपाली केळकर यांनी केले. दोन्ही कार्यक्रमांसाठी श्रोतृवर्गाला आपल्या शब्दांमध्ये गुंतवून ठेवलं सूत्रसंचालन करणार्या मिनीषा किरण वालावलकर यांनी. या दोन्ही कार्यक्रमांसाठी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पु. ल. कला महोत्सव 2023 मध्ये शनिवार, दि. 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 5 वाजाता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी "व्हायोलिनचे रंग-तरंग" या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सूरांचे अनोखे सादरीकरण करणार आहेत. तद्नंतर सायं. 7 वाजता संस्कार भारती, कोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण "लोकरंग दिवाळी संध्या" या कार्यक्रमात करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे होणार आहेत. पु. ल. कला महोत्सवामध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत.
रिपोर्टर