Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
राज्यातील टोल नाक्यांवर सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
राज ठाकरे यांनी टोलनाक्यासंदर्भातील प्रश्न आणि मुंबईतील पोलिसांच्या घरांबाबतच्या प्रश्नांवर निवेदन देऊन हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
मुंबई : संदिप शां. शिंदे
राज्यातील टोल नाक्यांवर सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी टोलनाक्यासंदर्भातील प्रश्न आणि मुंबईतील पोलिसांच्या घरांबाबतच्या प्रश्नांवर निवेदन देऊन हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
या बैठकीत प्रामुख्याने पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी, स्वच्छतागृहांसह रुग्णवाहिका, प्रथमोपचार यासारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर 15 दिवस व्हिडीओ चित्रीकरण करून वाहनांची निश्चित संख्या मोजावी, पथकर मार्गावरील पुलांचे तसेच शहरातील उड्डाणपुलांचे, भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कंत्राटदाराने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामध्ये स्वच्छता गृहे, रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, क्रेन याबाबी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता सतत राखली पाहिजे. मंत्री दादा भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींना सोबत घेऊन उद्यापासून टोल नाक्यांवरील सुविधांची पाहणी करावी असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच मुंबई हद्दीतील मुलुंड विभागातील हरिओम नगर येथील रहिवाशांना टोल नाक्यावरून मुंबई जावे लागू नये यासाठी नवघर पोलिस ठाण्याजवळील नाल्यावर तातडीने पुल उभारून त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलिसांना हक्काची घरे मिळावीत यासाठी सिडकोला पाच हजार घरांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मुंबईत पोलिसांना हक्काची घरे कशी मिळतील यासाठी खासगी विकासकांना आणि एसआरए प्रकल्पांमध्ये वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक देऊन अधिकची घरे मिळू शकतील का याचाही अभ्यास करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे,
आमदार प्रमोद पाटील, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलिस गृहनिर्माण मंडळाच्या अर्चना त्यागी, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी तसेच ठाण्यातील काही रहिवासी उपस्थित होते.
रिपोर्टर