Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्व गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण २०२१ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले...
मुंबई : वृत्तसंस्था..
मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियावरची संध्याकाळ ऐतिहासिकच होती. निमित्त होते महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण २०२१'च्या प्रदान सोहळ्याचे...आणि पुरस्काराच्या मानकरी होत्या दिग्गज गायिका आशाताई भोसले. ज्यांच्या स्वराने जीवनातील प्रत्येक भावना आणि लाखो क्षण सुरेल केले, सोनेरी केले. आपल्या स्वर्गीय सुरांचे चांदणे अखंडपणे शिंपून जगभरातील संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले जी यांना महाराष्ट्रभूषण २०२१ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंगनट्टीवार, पालक मंत्री दिपक केसरकर, मंगेशकर परिवारातील सदस्य संगीत चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह असंख्य मुंबईकर यावेळी देखील उपस्थित होते.
राज्याचा मुख्यमंत्री असताना आशाताईंना त्यांच्या मौलिक कार्यकर्तृत्वासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याची संधी मिळाल्याने जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटत असल्याचे मत याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आशाताईंनी आयुष्यभर विविध भाषांतील गाणी गाऊन संगीत क्षेत्राची केलेली सेवा ही अलौकिक असून आपल्या सांगीतिक कारकिर्दीत तब्बल १२ हजार गाणी गाणे हा एक चमत्कारच आहे. एकवेळ सत्तेची खुर्ची मिळवणे सोपे असते पण आबालवृद्धांना आपल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करून त्यांच्या मनावर इतकी वर्षे अधिराज्य गाजवणे हे खरोखरच अलौकिक असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी यासमयी व्यक्त केले.
आशाताईंचा स्वर हा एकाच वेळी देवापाशी हात जोडून उभे राहिल्यावर आणि घराबाहेर पडून मित्रांसोबत फिरताना ऐकला तरीही तेवढाच आनंददायक वाटतो. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. आयुष्यात अनेक चढउतार अनुभवूनही सदैव हसतमुख असलेला त्यांचा चेहरा पाहिल्यावर आम्हाला देखील त्यांच्यातली सकारात्मकता आत्मसात करावीशी वाटते असेही याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सांस्कृतिक कार्य सचिव विकास खारगे, मंगेशकर कुटूंबीय तसेच ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक सुभाष घई, निर्माते दिग्दर्शक रमेश सिप्पी, अभिनेत्री पूनम ढिल्लो, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे, अभिनेत्री श्रद्धा कपूर, संगीतकार अन्नू मलिक, गायक अमित कुमार, दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर, दिग्दर्शक भरत दाभोळकर, गीतकार समीर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर