Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळविणे आणि रुग्णालय अंगीकृत ( Empanelment ) या दोन्हीही प्रक्रिया पूर्णतः निःशुल्क : कक्षप्रमुख मंगेश चिवटे
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या नावाखाली गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या विकृतींवर पोलीस कार्यवाही करणार.
दलालांसोबत संगनमत करून रुग्णांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या रुग्णालयांना तात्काळ काळ्या यादीत ( Black List ) टाकणार.
छत्रपती संभाजीनगर येथील घटनेची कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी घेतली गंभीर दखल.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून बोगस निधी मिळवण्याचा प्रयत्न केल्यास होणार मोठी कारवाई; कक्षाच्या पथकांकडून अचानक भेटी.
मुंबई : प्रतिनिधी.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 2022 मध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला (CMMRF) नवसंजीवनी मिळाली आणि या कक्षाच्या कामाचा वेगाने विस्तार झाला. या कक्षातून मिळणाऱ्या अर्थसाहाय्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अवघ्या 1 वर्ष 8 महिन्यांच्या कार्यकाळात तब्बल 213 कोटी रुपयांहून अधिकचे अर्थसाहाय्य गरजू रुग्णांना वितरीत करण्यात आलं आहे. मात्र या कक्षाच्या कामाची व्याप्ती वाढवत असतानाच या कक्षातून दिल्या जाणाऱ्या निधीचा गैरउपयोग होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडूनच खबरदारी घेतली जात असून एका पथकाद्वारे या कक्षांतर्गत येणाऱ्या राज्यभरातील रुग्णालयांमध्ये अचानक भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. तसंच बनावट कागदपत्रांद्वारे अर्थसाहाय्य मिळवण्याचा प्रयत्न होत असेल तर संबंधित रुग्णालयाला थेट ब्लॅकलिस्ट करण्याचा कठोर निर्णय घेतला जात आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेत गोरगरीब रुग्णांना गंभीर किंवा दूर्धर आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करण्याचे प्रावधान आहे. या योजनेचा लाभ घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ही संपूर्णतः नि:शुल्क आहे. तसेच या योजनेत एखादे रुग्णालय अंगीकृत करण्याची संपूर्ण प्रक्रिया देखील नि:शुल्क आहे, अशा सूचना कक्षाने वारंवार, अगदी मंगेश चिवटे यांनी कक्षाचा पदभार स्वीकारल्यापासूनच स्पष्टपणे दिलेल्या आहेत. त्याचबरोबर रुग्णाने, रुग्णसेवकाने, रुग्णालय प्रशासनाने, रुग्णालयायातील एखाद्या कर्मचाऱ्याने याकामी कोणत्याही स्वरुपात आर्थिक देवाण-घेवाण केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल, अशाप्रकारे स्पष्ट निर्देश यंत्रणेला दिलेले आहेत. आजवर बहुतांश रुग्णसेवकांनी केलेल्या नि:स्वार्थी रुग्णसेवेमुळे अनेक निराधारांना आधार मिळाला. परंतु अलीकडे विशेषतः मराठवाड्यातील काही भागात या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेतून गरजूंना आर्थिक मदतीचा लाभ देण्यासाठी काही दुष्टप्रवृत्ती आर्थिक अपहार करत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून कक्षाला प्राप्त होत आहे. प्रसारमाध्यमांच्या या माहितीमध्ये सत्यांश आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
दरम्यान, जे रुग्णालय किंवा संशयित व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करून त्यासंबंधित माहिती लोकांसाठीही उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून मिळणाऱ्या मदतीत विक्रमी वाढ होत असताना या कक्षाचा कारभारही अधिकाधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत असलेल्या कुठल्याही रुग्णालयाच्या माध्यमातून अनुचित प्रकार आढळल्यास रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष - (022) 22026948/22025540
आवाहन! आवाहन !! आवाहन !!!
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गंभीर किंवा दुर्धर आजारांवरील उपचारासाठी गरजू रुग्णांना दिल्या जाणाऱ्या मदतीची, अर्थसहाय्याची प्रक्रिया ही पूर्णतः निशुल्क आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व गरजू रुग्णांनी, रुग्णांच्या नातेवाईकांनी याची विशेष नोंद घ्यावी.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामध्ये गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची आर्थिक देवाणघेवाण होत नाही.
महाराष्ट्रातील तमाम रुग्णसेवकांना तसेच वैद्यकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन करण्यात येते की, "रुग्णसेवा" हे पवित्र कार्य असून या कार्याला डाग लागेल अशा पद्धतीचे कोणतेही गैरवर्तन करु नये. असे आढळल्यास आपल्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या योजनेशी अंगीकृत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांना सूचित करण्यात येते की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांच्या उपचारासाठी आपणास प्राप्त होणारी रक्कम, ही संबंधित रुग्णाच्या उपचाराकरिता पूर्णतः उपयोगात आणावी. टीडीएस व अन्य चार्जेसच्या नावाखाली, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्राप्त झालेल्या रकमेत आर्थिक अपहार करू नये. ही कारणे देऊन रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल करु नये. असे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालयाचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे अंगीकरण कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल व संबंधित रुग्णालयाचा काळ्या यादीत समावेश होईल, याची सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी.
अशाप्रकारच्या गैरवर्तणुकीच्या घटना महाराष्ट्रात कोठेही घडल्यास, रुग्णांनी अथवा रुग्णांच्या नातेवाईकांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीशी संपर्क साधावा.
मंगेश नरसिंह चिवटे ( Mangesh Chivate ) कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
रिपोर्टर