Breaking News
अमरमहाल ते परळ जलबोगदा कामामध्ये एका महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन पूर्ण
- भूमिगत जलबोगदा खणन कामात महानगरपालिकेची विक्रमी कामगिरी !
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने भूमिगत जल बोगद्यांच्या खणन कामात नवीन उच्चांक नोंदवण्यात आला आहे. एका महिन्यात ५२६ मीटर खणन तर एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोनवेळा करण्याची किमया मुंबई महानगरपालिकेने साध्य केली आहे. किनारी रस्ता प्रकल्पाने भूमिगत बोगदा खणन करण्याची विक्रमी कामगिरी नुकतीच साध्य केल्यानंतर त्यापाठोपाठ पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने ही कामगिरी केल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी कौशल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याच्यावतीने पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण विभागांमध्ये तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.
हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱया भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर स्थित दोन मुख्य जलवाहिन्यांमधून येणारे पाणी या बोगद्यांद्वारे पुढे जाणार आहे.