Breaking News
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ४२२२ सदनिकांची ७ जानेवारी रोजी संगणकीय सोडत
- सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणी, अर्ज भरणा-स्विकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रारंभ
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या पुणे मंडळातर्फे पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत उभारलेल्या ४ हजार २२२ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज भरणे व अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. नवीन वर्षात नागरिकांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्तीकरीता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत म्हाडा पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील गृहनिर्माण भवन कार्यालयात ०७ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पवार यांच्या हस्ते सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना व प्रणाली या माहिती पुस्तिकेत समाविष्ट आहेत. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करणे आवश्यक राहील.