Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
संयुक्त महाराष्ट्र ते स्वायत्त महाराष्ट्र जनसंपर्क अभियान मुंबई व परिसरातील सदस्यांची बैठक दादर येथे संपन्न झाली.
स्वायत्त महाराष्ट्र जनसंपर्क अभियानात मुंबई ठाणे पालघर कोकण पुणे नाशिक लातूर कराड इत्यादी ठिकाणाहून 124 जणांनी गुगल अर्ज भरला.
मुंबई : प्रतिनिधी.
संयुक्त महाराष्ट्र ते स्वायत्त महाराष्ट्र जनसंपर्क अभियान, स्वायत्त महाराष्ट्र जनसंपर्क अभियानात मुंबई ठाणे पालघर कोकण पुणे नाशिक लातूर कराड इत्यादी ठिकाणाहून 124 जणांनी गुगल अर्ज भरला आहे.
स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे काय? स्वायत्त महाराष्ट्राची आवश्यकता आहे का? या विषयाला अनुसरून अभियानाच्या सदस्यांच्या तीन ऑनलाइन बैठका झाल्या.
मुंबई व परिसरातील सदस्यांची बैठक काल रविवार दिनांक 9 जून रोजी दादर येथे संपन्न झाली. यावेळी एकूण 25 सदस्य उपस्थित होते. ॲड. सुनिल साळुंखे, ॲड. भाटे, ॲड. श्रीकांत शिंदे, सुमित पाटील, प्रमोद सावंत, मनोज सावंत, तनेश सोमवंश ( नाशिक ), अनिल हातेकर, नारायण मिरजोळकर, संतोष आरेकर, प्रवीण बागवे, विलास कडगे या सर्वांनी स्वायत्त महाराष्ट्रा बद्दल आपले विचार मांडले. यावेळी सर्वांनी स्वायत्त महाराष्ट्राची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
सुमित पाटील यांनी राज्याचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्याला मिळाला पाहिजेत, असे सांगत संघराज्य सरकारने परराष्ट्रीय धोरण, संरक्षण धोरण, संघराज्यांचे आर्थिक धोरण या प्रकारचे निर्णय घ्यावेत. आंतरराज्यीय वाद विवादात समन्वयकाची भूमिका निभावून तंटे सोडवावेत असे मुद्दे मांडून महाराष्ट्राला आता स्वायत्त अधिकार मिळण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.
सद्यस्थितीत केंद्राने एक देश एक भाषा या धोरणाअंतर्गत राज्यांचे अधिकार कमी केले आहेत, असे ही सर्वांच्या निदर्शनास आणले.
संतोष आरेकर यांनी भारत संघराज्याची स्थापना होऊन आता 75 वर्षे झाली असून सर्व राज्य आता अनुभवी झाली असल्याने, आता संघराज्य सरकारने पालकाची भूमिका निभावून राज्यांना स्वायत्तता देत सीमा संरक्षण, परराष्ट्र धोरण यांसारखे सामायिक विषय हाताळावेत त्यांनी राज्यांतर्गत हस्तक्षेप करू नये. आमची भाषा संस्कृती, आमचा माणूस टिकवण्यासाठी आम्हाला आता स्वायत्त महाराष्ट्राची आवश्यकता आहे, असे ही सांगितले.
ॲड. सुनिल साळुंखे यांनी आपल्याला स्वायत्त महाराष्ट्र तर हवाच पण त्यासाठी आता पुढील कार्यपद्धती ठरवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करून स्वायत्त महाराष्ट्राची मागणी करताना आपलेच लोक आपल्या आड येणार आहेत त्यावेळी त्यांनाही सामोरे जाऊन त्यांना स्वायत्त हा विषय समजावून सांगण्याची तयारी करावी लागेल असे म्हटले. यावेळी त्यांनी ट्रेनमध्ये घडलेला एक किस्सा सांगितला. तीन परप्रांतीय एका मराठी माणसाला शुल्लक कारणावरून दादागिरी करीत होते. ते हातापायी करण्याच्या तयारीत असताना दरवाजा जवळ उभ्या असलेल्या, एका मराठी माणसाने त्या तिघांच्या विरोधात आपल्या माणसाची बाजू घेतली अन्यथा ती वरचढ झाली असती यावेळी इतर मराठी माणसे फक्त पाहत होती हे चित्र आता बदलावे लागेल. तसेच मुंबई बाहेरच्या मराठी लोकांना मुंबई आपली वाटत नाही पण या परप्रांतीय लोंढ्याचा धोका व त्यातून उद्भवणारे दुष्परिणाम त्यांनाही भोगावे लागतील याबद्दल उर्वरित महाराष्ट्रात जनजागृती करावी लागेल व या जनजागृती संपर्क अभियानात समाजातील सुशिक्षित वर्गाला ही जोडावे लागेल असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्र टिकवायचा असेल तर प्रथम मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकवावा लागेल असे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत जसे आपण फक्त मराठी उमेदवार पाहिजे अशी मागणी केली तशीच विधानसभा निवडणुकीतही मराठी उमेदवार पाहिजे अशी मागणी लावून धरावी लागेल. आता ती वेळ आहे, जर ही वेळ हातातून निघून गेली तर मराठी माणसाला महाराष्ट्रात उपरे व्हावे लागेल या बद्दल उपस्थितांना आवाहन केले.
प्रवीण बागवे यांनीही स्वायत्त महाराष्ट्र ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक राज्यातील राजकारण्यांनी त्यांच्या लोकांना उद्योग निर्मिती करून रोजगार दिला पाहिजे असे सांगितले. जेणेकरून त्या राज्यातील लोक विस्थापित होऊन दुसऱ्या राज्यावरचा भार होणार नाहीत.
कांदिवलीच्या नारायण मिरजोळकर यांनी अजून एका मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले, ते म्हणजे बाहेरून आलेले लोक इथे व्यवसाय धंदा करतात पण त्यांना स्थानिक भाषा येत नाही व स्थानिक विभागाची माहिती ही नसते. परप्रांतीय कुठून येतात, कुठे राहतात, काय करतात याचा पत्ता कोणालाही नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मनोज सावंत यांनीही स्वायत्त महाराष्ट्र ही चळवळ आवश्यक असून, जिथे जिथे मराठीवर अन्याय होईल, तिथे जाऊन सर्वांनी व्यक्तिशः किंवा कार्यरत संघटनांच्या माध्यमातून तक्रारी केल्या पाहिजेत. प्रत्येकाने ही जबाबदारी घेतलीच पाहिजे. मुंबईत येणारे लोंढे तात्काळ थांबले पाहिजेत. आता कोकण प्रांतातही परप्रांतीयांचे लोंढे घुसत असल्याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. यावेळी त्यांनी डॉक्टर, सीए, ॲडव्होकेट, शिक्षक यांसारख्या सुशिक्षित लोकांनाही या चळवळीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
विलास कडगे यांनी आपल्या राज्यात भाषा रोजगार या विषयात आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगून आपल्या मागण्या आपल्या राज्यकर्त्यांकडे पोहोचल्या पाहिजेत असे प्रतिपादन केले. तसेच आपल्या राज्याचे अधिकार आपल्याकडेच असले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
नाशिकहून आलेल्या तनेश सोमवंश यांनी रियल इस्टेट साठी शेतजमिनींचा वापर केला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. माझ्या राज्यात माझीच भाषा असली पाहिजे, माझ्या राज्यातील नोकऱ्या या फक्त माझ्या लोकांसाठीच असल्या पाहिजेत. संघराज्याच्या आस्थापनातील नोकऱ्या ही स्थानिक मराठी माणसांनाच मिळाल्या पाहिजेत आणि यासाठीच मला स्वायत्त महाराष्ट्र पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले.
ॲड. श्रीकांत शिंदे यांनी आपण संयुक्त महाराष्ट्राकडून आता स्वायत्त महाराष्ट्र कडे जात आहोत. पण महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत जातीजातींमध्ये भिंती उभ्या करून ठेवल्या आहेत, यातून आपणास मार्ग काढावा लागेल असे सांगितले. संघराज्य सरकारने ज्या ज्या राज्यातील लोक रोजगारासाठी विस्थापित होत आहेत, त्या राज्यांनाही तिथे विकास करण्यास भाग पाडले पाहिजे असे सांगितले. महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक उमेदवार उभे राहतात, तसे इतर राज्यांमध्ये कुठे घडत नाही आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अनिल हातेकर यांनीही परप्रांतीय लोंढ्यांकडे लक्ष वेधले. त्यांच्यामुळे आम्हाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. स्वायत्त महाराष्ट्रामध्ये आमचे सर्व हक्क, राज्याशी इथल्या जनतेशी निगडित निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडेच पाहिजे असे सांगत, आम्हाला स्वायत्त महाराष्ट्राची गरज आहे असे सांगितले.
ॲड. भक्ती भाटे यांनी स्वायत्त महाराष्ट्र करताना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावे लागतील. आपल्या मुलांना आपल्या भाषा संस्कृती व रोजगाराशी निगडित असे आधुनिक पद्धतीचे शिक्षण दिले पाहिजे तसेच महाराष्ट्रातील उद्योगधंदे रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.
या सभेचे सूत्रसंचालन करणाऱ्या प्रमोद मसुरकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे घोषित केले.
रिपोर्टर