Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
27 वर्षांनी मोहालीत भारताचा विजय; सूर्या-शमी-गिल आणि ऋतुराज चमकले.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला.
मुंबई : गुरुदत्त वाकदेकर
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सर्व बाद 276 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 52, जोश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या. ऋतुराजने 71 धावांची तर शुभमन गिलने 74 धावांची खेळी केली. तर, सूर्यकुमार यादव 50 धावा करून बाद झाला. कर्णधार केएल राहुलने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 49 व्या षटकात शॉन आयबॉटला षटकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
भारताने 1996 नंतर म्हणजेच 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावरील दोघांमधील हा सहावा सामना होता. यापैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. 1996 नंतर ऑस्ट्रेलियाने 2006, 2009, 2013 आणि 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला. म्हणजे या मैदानावर ऑस्ट्रेलियाने शेवटचे चार एकदिवसीय सामने जिंकले होते.
मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये तर तिसरा 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांची ही शेवटची मालिका आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ आपली तयारी पूर्ण करू इच्छितात. या विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकत एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन टीम बनली आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. शमीने पहिल्याच षटकात मिचेल मार्शला तंबूमध्ये पाठवले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 106 चेंडूत 94 धावांची भागीदारी झाली. जडेजाने ही भागीदारी भेदली. त्याने वॉर्नरला शुभमनकरवी झेलबाद केले. वॉर्नरने 53 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. यानंतर शमीने स्मिथला त्रिफळाचीत केले. त्याला 60 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 41 धावा करता आल्या. मार्नस लॅबुशेन 49 चेंडूत 39 धावा, कॅमेरॉन ग्रीन 31 धावा आणि मार्कस स्टोइनिस 29 धावा करून बाद झाले. जोश इंग्लिसने 45 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. मॅथ्यू शॉर्ट, शॉन अबॉट आणि अडम झाम्पा प्रत्येकी दोन धावा करून बाद झाले. कर्णधार पॅट कमिन्सने नऊ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 21 धावा केल्या. भारताकडून शमीने पाच विकेट घेतल्या. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर बुमराह, अश्विन आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
277 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन आणि ऋतुराजच्या जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 130 चेंडूत 12 धावा जोडल्या. यादरम्यान शुभमनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले आणि ऋतुराजने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. टीम इंडियाला पहिला धक्का 142 धावांवर बसला. झम्पाने ऋतुराजला पायचीत टिपले. तो 77 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने 71 धावा करून बाद झाला. यानंतर भारतीय संघाने नऊ धावा करताना तीन विकेट गमावल्या. श्रेयस अय्यर तीन धावा करून धावबाद झाला, तर झम्पाने शुभमनला त्रिफळाचीत केले. शुभमनने 63 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 74 धावांची खेळी केली.
इशान किशनने 26 चेंडूत 18 धावांची खेळी खेळली. यानंतर कर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी पाचव्या विकेटसाठी 85 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली. सूर्याने एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. तो 49 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा करून बाद झाला. राहुलने एकदिवसीय कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक झळकावले. त्याने 63 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या. तर जडेजा तीन धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून झंपाने सर्वाधिक दोन बळी घेतले. त्याचवेळी कमिन्स आणि अबॉट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
सामन्यात घडले हे विक्रम...
• या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सात एकदिवसीय सामन्यांपैकी सहा सामने जिंकले होते, ज्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 1996 विश्वचषक उपांत्य फेरी आणि 2006 ची चॅम्पियन्स ट्रॉफी न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीचा समावेश होता.
• 2011 च्या विश्वचषकापासून, मोहालीमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी सातपैकी सहा एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
• या सामन्यात भारताच्या चार फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. या बाबतीत टीम इंडियाने आपल्या विक्रमाची बरोबरी केली.
• भारतासाठी तीनदा धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत चार फलंदाजांनी पन्नास किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी 2006 मध्ये इंदूरमध्ये इंग्लंडविरुद्ध आणि 2008 मध्ये कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या चार फलंदाजांनी पन्नास किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या.
रिपोर्टर